Dharwad

धारवाडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणावर गोळीबार

Share

धारवाडमध्ये जमिनीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शेतात काम करत असलेल्या तरुणावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असून, जखमी तरुणाला उपचारासाठी एस.डी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धारवाडच्या बाहेरील ताडसिनकोप्प जवळील IIIT (ट्रिपल आयटी) परिसरात जमिनीच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. विठ्ठल वालीकार (वय २४) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो शेतात काम करत असताना हा हल्ला झाला. जमिनीचा जुना वाद मिटवण्यासाठी गावातील प्रमुख नेते आणि नागरिक एकत्र आले होते आणि त्यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, यादरम्यान दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि वाद वाढला. याच दरम्यान हल्लेखोरांनी अचानक विठ्ठलच्या पायावर गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने विठ्ठलला तातडीने धारवाड येथील एस.डी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त शशीकुमार यांनी घटनास्थळासह रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त शशीकुमार यांनी तातडीने एस.डी.एम. रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस करून आयुक्तांनी घटनेची प्राथमिक माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणी आणि नेत्यांच्या उपस्थितीतच असा सशस्त्र हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून विद्यागिरी पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags: