बेळगावमधील कित्तूर परिसराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्याशेजारील खड्ड्यात उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी दुर्घटना टळली आहे. धारवाड येथील तरुणांच्या सतर्कतेमुळे चालकाला वेळीच ट्रकमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बेळगावमधील साखर कारखान्यातून साखरेची पोती घेऊन हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरून धारवाडच्या दिशेने जात होता. कित्तूरजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या धारवाड येथील जिलानी काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात पाहताच तातडीने मदत केली. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून पाणी दिले आणि त्याची विचारपूस केली.

तरुणांच्या या पथकाने तातडीने हायवे पेट्रोलिंग पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाची विचारपूस केली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. ही घटना बेळगावमधील कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments