धारवाड स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून आज ११ व्या दिवशी या आंदोलनाला मोठे यश आले आहे. स्वतंत्र पालिकेच्या मागणीला पाठिंबा देत हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून राज्यपालांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या धारवाड कार्यालयासमोर गेल्या ११ दिवसांपासून स्वतंत्र पालिकेसाठी आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलन मंचावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी एकत्र येत आपले राजीनामे सुपूर्द केले आणि थेट आंदोलनात उडी घेतली. यापूर्वी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, मात्र आता थेट लोकप्रतिनिधींनीच राजीनामे देऊन आंदोलनात सहभाग घेतल्याने या मागणीला मोठे बळ मिळाले आहे.

धारवाड स्वतंत्र महानगरपालिका निर्मितीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी न केल्यामुळे आंदोलनकर्ते आणि नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यपालांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली नाही, तर त्यांच्या विरोधात राज्यभरात ‘गो-बॅक’ चळवळ आणि तीव्र निषेध आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला दिला आहे.


Recent Comments