Khanapur

खानापूरमधील वरकडे आणि पाटये भागात जंगली हत्तींचा वावर

Share

खानापूर तालुकयातील वरकडे आणि पाटये परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. हत्तींच्या सततच्या वावरामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिक प्रचंड भीतीखाली असून, शेतात जाणे किंवा लोंढा बाजारपेठेत प्रवास करणे कठीण झाले आहे.


वरकडे आणि पाटये भागात ठाण मांडून बसलेल्या हत्तींच्या कळपाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाटये गावातील शेतातील उसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यानंतर या हत्तींनी आता वरकडे गावातील सर्व्हे नंबर ५० मधील शेतात मोर्चा वळवला आहे. तेथील सुपारी आणि नारळाची झाडे मुळासकट उखडून टाकण्यासोबतच केळीच्या बागांचेही अतोनात नुकसान केले आहे.

लोंढा वनपरिक्षेत्राच्या वन अधिकाऱ्यांनी नुकतीच घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. मात्र, वन विभागाने केवळ पाहणी न करता तातडीने मोहीम हाती घेऊन या जंगली हत्तींना मानवी वस्तीतून दूर जंगलात हाकलून लावावे, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: