Hukkeri

हुक्केरी तालुक्यातील गावांना पाणी न मिळाल्यास हिडकल धरणाची पाईपलाईन फोडणार

Share

हुक्केरी आणि यमकनमर्डी मतदारसंघातील पाणीवंचित गावांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आज अधिक तीव्र झाले आहे. हुक्केरी तालुक्यातील ३० ते ४० वंचित गावांना तातडीने पाणी पुरवठा न केल्यास हिडकल धरणाची पाईपलाईन फोडण्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हुक्केरी आणि यमकनमर्डी मतदारसंघातील पाणीवंचित गावांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आज सलग दुसऱ्या दिवशी सुरूच राहिले. आमच्या पायाखाली आग आणि डोक्यावर पाण्याची पाटी अशी आमची स्थिती झाली असून पाळीव प्राण्यांना पाणी न देता ते उद्योगांना दिले जात आहे. सरकारने आज संध्याकाळपर्यंत योग्य निर्णय जाहीर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. बबलेश्वर मतदारसंघाप्रमाणे या भागातही सिंचन योजना राबवल्यास मंत्र्यांची धान्याने तुळा करू, अन्यथा राजकारण्यांना धडा शिकवू, अशी प्रतिक्रिया शशिकांत गुरुजी यांनी दिली.

मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत उद्या हुक्केरी आणि यमकनमर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच राज्यातील २२4 आमदारांच्या घरासमोर हलगी वाजवून आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. प्रशासनाने अडथळा आणल्यास हिडकल धरणावर पदयात्रा काढून पाईपलाईन फोडू आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरी सामोरे जाऊ, असा थेट इशारा शशिकांत गुरुजी यांनी दिला.

Tags: