Bagalkot

बागलकोटमध्ये रेशनच्या तांदळाचा मोठा साठा जप्त

Share

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यात बेकायदेशीरपणे रेशनच्या तांदळाची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अन्न विभाग आणि पोलिसांनी कोर्ती पुनर्वसन केंद्रावर संयुक्त छापा टाकून मोठ्या प्रमाणावर तांदळाचा साठा आणि वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


बीळगी तालुक्यातील कोर्ती पुनर्वसन केंद्रात शासकीय रेशनच्या तांदळाची बेकायदेशीर साठवणूक करून तो विकला जात असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बीळगीचे तहसीलदार विनोद हत्तळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली अन्न विभाग आणि पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान गोदामात लपवून ठेवलेली २० हून अधिक रेशनच्या तांदळाची पोती, वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ दुचाकी आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला.


या प्रकरणी अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सुनग एलटी १ गावातील रहिवासी आहेत. शासनाकडून गरीब नागरिकांना वितरित करण्यात येणारा अन्नभाग्य योजनेचा हा तांदूळ काळ्या बाजारात चढ्या दराने विकण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता, असे तपासात समोर आले आहे.

कारवाईनंतर अन्न विभागाने तिन्ही आरोपींना बीळगी पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या संदर्भात बीळगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेशन तांदळाच्या या काळ्या बाजाराच्या मागे असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Tags: