बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर शहरात आज सकाळपासूनच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.


मुधोळ तहसीलदार यांच्या आदेशानंतर प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलत पादचाऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्याशेजारील अतिक्रमित दुकानांवर जेसीबी चालवून ती हटवली आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला असून अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला आहे.

बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर शहरातील मुख्य केंद्र असलेल्या बसवेश्वर चौकाजवळ आज पहाटेच अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. मुधोळ तहसीलदार यांच्या कडक सूचनेनंतर मुधोळ ईओ आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या पथकाने रस्त्याशेजारील अनधिकृत दुकाने आणि गाळे हटवण्यास सुरुवात केली. दीर्घकाळापासून पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारी दुकाने जमीनदोस्त करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुकाने हटवल्यामुळे रस्त्यावरील छोटे व्यापारी अडचणीत आले आहेत. कारवाई दरम्यान अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. टेंडर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एका महिलेने अश्रू अनावर होऊन आपली व्यथा मांडली. हक्काच्या व्यवसायासाठी प्रशासनाने पर्यायी जागेची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी करत बाधित व्यापाऱ्यांनी या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments