Athani

अथणीत चोऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महिलांना अटक

Share

अथणी बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. संशयित महिलांकडून ६८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

बेळगाव मधील अथणी शहराच्या बस स्थानकामध्ये संशयास्पद रित्या फिरणाऱ्या दोन महिलांना अथणी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता चोरीचे रॅकेट समोर आले आहे. हेमा कसबेकर आणि निलम कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील महिलांची नावे आहेत. या आंतरराज्य महिला चोरा प्रवाशांच्या वेषात बस स्थानकावर वावरत असत. बसमध्ये चढताना आणि उतरताना होणाऱ्या गर्दीचा तसेच गोंधळाचा फायदा घेऊन त्या महिला प्रवाशांचे दागिने चोरून पसार होत असत.

अटक केलेल्या महिलांच्या चौकशीदरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेले चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयित चोरांकडून पोलिसांनी ६८ लाख रुपये किमतीचे एकूण ४२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. बस स्थानकांवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या महिलांना अटक केल्याने अथणी भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या कारवाईबद्दल अथणी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: