Khanapur

खानापूरमध्ये भरधाव कार शिरली थेट दुकानात..

Share

खानापूर तालुक्यातील बिडी गावात मंगळवारी संध्याकाळी एक भीषण रस्ते अपघात झाला. बाजारपेठेतील गर्दीत भरधाव वेगाने आलेल्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट हार्डवेअर दुकानात घुसली असून या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

खानापूर तालुक्यातील बिडी गावातील कसबा-नंदगड मार्गावरील वळणावर मंगळवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. भरधाव वेगातील कार चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. नियंत्रण सुटलेली कार थेट रस्त्याशेजारील सागर पाटील यांच्या मालकीच्या ‘साईकृपा हार्डवेअर अँड पेंट’ दुकानात शिरली. मंगळवारी बाजाराचा दिवस असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी होती. दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चिरडत कार आत घुसल्याने दुकानातील पेंट आणि हार्डवेअर साहित्याचे नुकसान झाले असून सुमारे एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या अपघाताच्या तीव्रतेमुळे दुकानासमोर उभा असलेला एक ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. जखमीला तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाण्याचे पीएसआय बळिगार, पीएसआय महानंदा आणि हवालदार एन. ए. चंदरगी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली कार ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

Tags: