Bagalkot

बागलकोट: कौटुंबिक वादातून तरुणाची लोखंडी रॉडने मारून हत्या

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यामधील कुरुगोड गावात कौटुंबिक वादातून एका तरुणाची लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

सिद्धप्पा बिरादार असे मृत तरुणाचे नाव असून तो संध्याकाळच्या वेळी आपल्या दुचाकीवरून शेताकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे सिद्धप्पा याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सावळगी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासानुसार, मृत सिद्धप्पा आणि त्याच्या भावामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धप्पाच्या वडिलांना दोन पत्नी असून, पहिल्या पत्नीच्या मुलांमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद होता. या कौटुंबिक कलहातूनच हा पूर्वनियोजित खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत सिद्धप्पाच्या आईने या संदर्भात सावळगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणी इतर बाजूंनीही तपास करत आहेत. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Tags: