धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करत विविध संघटनांचे नेते पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आले असून, स्वतंत्र महानगरपालिकेला विरोध करणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या धारवाड येथील कार्यालयासमोर धारवाड स्वतंत्र महानगरपालिका संघर्ष समिती, धारवाड ध्वनी संघटना आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलनकर्त्यांनी विरोधकांचा निषेध करत ‘एचडीएमसी नको, डीएमसी हवी’ अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारने आधीच धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मात्र, काही जण राजकीय स्वार्थापोटी या प्रक्रियेत अडथळे आणत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

धारवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महानगरपालिका अत्यंत आवश्यक आहे. स्वतंत्र महानगरपालिकेची फाईल सध्या राज्यपालांकडे असून, त्यांनी त्यावर स्वाक्षरी करून शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राज्यपालांनी याला मंजुरी द्यावी, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


Recent Comments