Vijayapura

विजापूरमध्ये भरचौकात शेतकऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Share

विजापूर जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात असताना, योग्य मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या समोरच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विजापूर जिल्हा रुग्णालयात सध्या ४४ वर्षीय शेतकरी मल्लनागौडा बिरादार हे मृत्यूशी झुंज देत आहेत. तळेवाड येथील या शेतकऱ्याच्या जमिनीतून एनटीपीसीकडून सोलापूरला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांसाठी मोठे खांब उभारले जात आहेत. यामुळे सुमारे ३ गुंठे जमिनीचे नुकसान होणार असल्याने मल्लनागौडा यांनी योग्य मोबदल्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ १५ लाखांचा प्रस्ताव दिला, तर शेतकरी ३० लाखांवर ठाम होते. यावेळी अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याने हतबल झालेल्या मल्लनागौडा यांनी कीटकनाशक पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मल्लनागौडा यांची पत्नी संगमम्मा यांनी दिली.

मल्लनागौडा यांच्याकडे केवळ दोन एकर जमीन असून, हायटेंशन वीजवाहिन्यांमुळे आता तिथे पीक येणे कठीण झाले आहे. गडग जिल्ह्याच्या धर्तीवर भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. या अन्यायाविरुद्ध दाद मागतानाच मल्लनागौडा यांनी टोकाचे पाऊल उचलले. ही बातमी समजताच शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रशासनाचा निषेध केला.

या घटनेवर बोलताना विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “इतर शेतकरी भरपाईला तयार आहेत, मात्र काही लोक केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी असे करत आहेत,” असे पाटील यांनी म्हटले. मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला ब्लॅकमेलर म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल शेतकरी नेते मल्लिकार्जुन केंगानाळ यांनी उपस्थित केला आहे. सरकार आणि कंपन्यांच्या वादात नाहक बळी दिला जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: