बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून वन विभागाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.


खानापूर तालुक्यातील जांबोटी मार्गावरील रामगुरवाडी क्रॉसजवळ वादळी वाऱ्यामुळे एक अजस्त्र झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रभारी एसीएफ बेलबाददेवी बिरादार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने झाड कापून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.


या मोहिमेत डीआरएफओ गुरुनाथ बायन्नवर, मेलिनमनी आणि वन कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, अशी माहिती बेलबाददेवी बिरादार यांनी दिली.

दुसरीकडे, नागरगाळी आणि तावरगट्टी रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या वनक्षेत्रात रेल्वे रुळांवर झाडे कोसळली. यामुळे अळनावर-लोंढा रेल्वे मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. प्रामुख्याने कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस काही काळ थांबवून ठेवावी लागली. रेल्वे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुळांवरील झाडे हटवून रेल्वे वाहतूक पूर्ववत केली. जंगल परिसरात झालेल्या या पावसामुळे पर्यटकांचे हाल झाले असून दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे.


Recent Comments