बागलकोटमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी जमा होत राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला.


बागलकोट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एआयटीयूसी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे भव्य आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून हक्काचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. वेळेवर वेतन मिळत नसताना सरकारकडून कामाचा ताण मात्र वाढवला जात आहे. सततच्या कामामुळे जीवन असह्य झाले असून सरकार आमच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत असल्याची खंत स्वयंसेविकांनी व्यक्त केली.

या आंदोलनाद्वारे प्रलंबित वेतन त्वरित मिळावे, कामाच्या वेळा निश्चित कराव्यात आणि सेवा सुरक्षा प्रदान करावी, अशा प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्य सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आम्हाला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय मिळावा, अशी मागणी आशा स्वयंसेविकांनी या प्रसंगी केली.


Recent Comments