भारतीय रेल्वे आणि नैर्त्रुत्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत कन्नड उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत संघटनांनी हुबळीमध्ये तीव्र निदर्शने केली. रेल्वे प्रशासनाच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे भरती परीक्षेत कन्नड भाषिकांना डावलले जात असल्याचा आरोप करत कन्नड रक्षण वेदिकेच्या वतीने हुबळीमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून स्थानिक उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

कन्नड रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष प्रवीण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयावर धडक देण्यासाठी पदयात्रा काढली. रेल्वेतील पदोन्नतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये कन्नड भाषेला योग्य स्थान दिले जात नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. जेव्हा जेव्हा आंदोलन होते, तेव्हा प्रशासन परीक्षा रद्द करते किंवा पुढे ढकलते, मात्र पुन्हा तीच पद्धत अवलंबली जाते, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक कन्नड उमेदवारांना नोकरी आणि बढतीमध्ये समान संधी मिळायला हवी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.


Recent Comments