अथणी तालुक्यातील सत्ती गावातील बार मालकांची मुजोरी वाढली असून कायद्याची भीती न बाळगता रात्रंदिवस मद्यविक्री सुरू असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या बाहेर असलेल्या ‘अनुश्री पेग’ बारमध्ये अबकारी नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. बारचे पुढचे प्रवेशद्वार बंद असल्याचे दाखवले जात असले, तरी मागच्या दारातून २४ तास मद्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. ठराविक वेळेची मर्यादा ओलांडून व्यवहार होत असतानाही अबकारी विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत कायद्याचे उल्लंघन होत असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने सत्ती गावातील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने या अवैध प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित बारवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सत्ती ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments