Khanapur

खानापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह बनले मद्यपींचा अड्डा

Share

खानापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या निवासासाठी असलेल्या या वास्तूच्या परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकेकाळी सुंदर असलेल्या या विश्रामगृह परिसरात सध्या केवळ कचरा आणि वाळलेली झाडे पाहायला मिळत आहेत. विश्रामगृहाच्या उद्यानामध्ये गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या बाटल्या आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे कार्यालय अगदी शेजारी असूनही विश्रामगृहाची ही अवस्था होणे दुर्दैवी आहे.

या संपूर्ण अव्यवस्थेला विभागाचे अभियंता संजय गस्ती यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केला आहे. कार्यालयाच्या समोरच कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाही अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.

खानापूरच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या विश्रामगृहाची त्वरित स्वच्छता करून तिथे पुन्हा हरित परिसर निर्माण करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. सध्या या सरकारी वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags: