धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून त्यांना योगेशगौडा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचा आरोप करत, त्यांच्या समर्थकांनी धारवाडमध्ये भव्य मूक मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

हुबळी-धारवाड जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो समर्थकांनी हाताला काळ्या फिती बांधून शहरातील कलाभवन ते सुभाष रोडवरील केसीसी बँक सर्कलपर्यंत मूक पदयात्रा काढली.
आंदोलकांनी विनय कुलकर्णी यांची छायाचित्रे असलेले फलक हातात धरून या प्रक्रियेचा निषेध केला. विनय कुलकर्णी हे लोकभिमुख आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नेते असून, त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हे कारस्थान रचले गेल्याची भावना आंदोलक नेत्यांनी व्यक्त केली.
आमदारांनी आपल्या मतदारसंघात केलेली विकासकामे आणि त्यांची साधी राहणी यामुळे त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत. अशा नेत्याविरुद्ध चाललेली ही राजकीय खेळी अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. तसेच, या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितल्यानंतर विनय कुलकर्णी यांना नक्कीच न्याय मिळेल, असा ठाम विश्वास समर्थकांनी यावेळी व्यक्त केला.


Recent Comments