Savadatti

सौंदत्तीतील किटदाळमध्ये मद्यविक्रीच्या परवान्यावरून ग्रामस्थांचे आंदोलन

Share

सौंदत्ती तालुक्यातील किटदाळमध्ये ग्रामसभेचा दारूबंदीचा निर्णय डावलून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या प्रशासकीय भूमिकेविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

किटदाळ गावाच्या हद्दीत ‘रॉयल सोशल क्लब’च्या नावाखाली मद्यविक्री सुरू करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गावात ग्रामसभेने यापूर्वीच दारूबंदीचा ठराव मंजूर केलेला असतानाही प्रशासनाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.

गावाच्या हद्दीत मद्यविक्री रोखण्यासाठी महिला, तरुण आणि शेतकऱ्यांनी गेल्या एक वर्षापासून लढा सुरू ठेवला आहे. अरटगाळ ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी, सौंदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेगण्णावार आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणात राजकीय दबावाचा वापर करून परवाना मिळवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित क्लब चालक हा एका लोकप्रतिनिधीचा माजी स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे.

महसूल आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ग्रामस्थांच्या भावनांची पायमल्ली करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने त्याची दखल न घेता परवानाधारकाचीच पाठराखण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुलांच्या भविष्यासाठी गावात दारूबंदीची मागणी करत असताना जबाबदार अधिकारीच मद्यविक्रीला पाठबळ देत असल्याची टीका महिलांनी केली आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी गावात मद्याचा ट्रक आला असता ग्रामस्थ आणि पुरवठादारांमध्ये मोठा वाद झाला. पोलिसांनी परिस्थिती हाताळली असली तरी रात्री पुन्हा मद्य वाहतूक करून तणाव निर्माण करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या वादातून भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी थेट जबाबदार राहतील, असा इशारा किटदाळमधील नागरिकांनी दिला आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: