कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अथणी तालुक्यातील कतगेरी येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.


यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अथणीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रार्थनाने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तिने सर्व विषयांत पैकीच्या पैकी म्हणजे ६२५ गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने सरकारी शाळेत शिकून मिळवलेल्या या यशामुळे सरकारी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील विविध केंद्रांवरून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. प्रार्थना बिरादार हिच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तिचे विशेष अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विद्यार्थिनी प्रार्थना बिरादार म्हणाली की, मला अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, याचा खूप आनंद होत आहे. माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, ज्यामुळे हे यश शक्य झाले. आता पुढे पीयुसी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट परीक्षेची तयारी करण्याचे माझे स्वप्न आहे,” असे प्रार्थनाने सांगितले.
तर “खासगी शाळांप्रमाणेच सरकारी शाळांमध्येही अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जाते, हेच आमच्या मुलीने आज सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे,” अशी भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.


Recent Comments