बागलकोट जिल्ह्यातील केरूळ पोलीस ठाण्यावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला असून, लाच स्वीकारताना पोलीस फौजदार आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहात पकडले आहे.

बागलकोट जिल्ह्यातील बादामी तालुक्यातील केरूळ शहरात भ्रष्टाचाराविरुद्धचा जनआक्रोश पाहायला मिळाला. लोकायुक्त जाळ्यात अडकलेले फौजदार भीमप्पा रबकवी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काल सायंकाळपर्यंत लोकायुक्त अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती, त्यावेळी ठाण्यासमोर शेकडो नागरिक जमा झाले होते. हे फौजदार ज्येष्ठ नागरिकांचा एकेरी उल्लेख करून अपमान करायचे आणि पैशांसाठी लोकांचा छळ करायचे, असा आरोप करत नागरिकांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याची जाहीर धिंड काढण्याची मागणी केली.
लोकायुक्तांची चौकशी संपवून फौजदार बाहेर येताच केरूळमधील तरुण आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरच फटाके फोडले आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. फौजदार भीमप्पा यांच्या लाचखोरीला कंटाळलेल्या जनतेने, या कारवाईमुळे शहराची त्रासातून सुटका झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी घटनास्थळी यावे, अशी मागणी करत नागरिकांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी निदर्शने केली.


Recent Comments