Hukkeri

मदमक्कनाळमध्ये महालक्ष्मी द्यामव्वा देवीच्या नूतन मूर्तीचे उत्साहात स्वागत

Share

हुक्केरी तालुक्यातील मदमक्कनाळ गावामध्ये महालक्ष्मी द्यामव्वा देवीच्या नूतन मूर्तीचे मिरवणुकीने वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

बस्तवाड सीमेवरील लगमव्वा मंदिरापासून वाद्यांच्या गजरात आणि हजारो महिलांच्या कुंभमेळ्यासह देवीची सुवर्णालंकारांनी सजलेली मूर्ती मदमक्कनाळ गावात आणण्यात आली. गावातील तरुण भंडाऱ्यात न्हाऊन निघत मिरवणुकीत आनंदाने सहभागी झाले होते.

महालक्ष्मी द्यामव्वा देवीच्या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असून आजवर मूर्तीशिवाय पूजा केली जात होती. आता ग्रामस्थांच्या पुढाकाराने नूतन मूर्तीची निर्मिती करून तिचे स्वागत करण्यात आले असून, हा दिवस गावासाठी सुवर्णक्षणासारखा असल्याचे मल्लाप्पा बडिगेर यांनी म्हटले.

हिरण्यकेशी नदीच्या काठावर असलेल्या मदमक्कनाळ गावात अनेक मंदिरे आहेत. गावकऱ्यांनी अलीकडेच महालक्ष्मी द्यामव्वा देवीचे मंदिर उभारले असून आज मोठ्या उत्साहात मूर्तीचे आगमन झाले, अशी माहिती शिक्षक के. एस. पाटील यांनी दिली.

या सोहळ्याप्रसंगी मल्लाप्पा बडिगेर, के. एस. पाटील, निवृत्त अभियंता एस. के. पाटील, बसय्या हिरेमठ, राजू तेरणी यांच्यासह महालक्ष्मी द्यामव्वा मूर्ती प्रतिष्ठापना समितीचे सदस्य आणि मदमक्कनाळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी विविध मठांच्या स्वामींच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

Tags: