धारवाडमध्ये १० एप्रिल रोजी युथ काँग्रेसचे सरचिटणीस फैरोज पठाण यांची झालेली निर्घृण हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करत धारवाड उपनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत ९ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


धारवाडमधील माळपूर हाश्मीनगर येथील रहिवासी फैरोज पठाण आपल्या घराच्या आवारात मोबाईलवर बोलत उभे असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फैरोज यांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईलही सोबत नेला होता.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेतला. उप्पिन बेटगेरी येथे लपलेल्या आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी महंमद शाह, सय्यद गौस जानीशाह, परवेज आलम महालदार, समीर अहमद मकानदार, सद्दाम हुसेन नवलगुंद, कैफ रहमानभाई, अरबाज हंचिनाळ, सोहिल खान हालभावी आणि मक्तुम सोगलद या नऊ जणांना अटक केली आहे.
फैरोज पठाण आणि मुख्य आरोपी महंमद शाह यांच्यात जुना वैयक्तिक संघर्ष होता. फैरोज यांच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा कट रचल्याची कबुली आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. त्यांच्यातील वादाची अनेकदा पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. याच द्वेषातून महंमद शाह याने साथीदारांच्या मदतीने फैरोज यांची हत्या केल्याचे हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या असून आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. फैरोज यांच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी फैरोज पठाण यांच्या नातेवाईकांनी केली आहे.


Recent Comments