Khanapur

खानापूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Share

खानापूरमधील विद्यानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून या घटनेत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

खानापूर शहरातील विद्यानगर भागात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. शाब्दिक चकमकीनंतर एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस देसाई यांना आरोपी ऋषांत पुजारी हा गेल्या महिन्याभरापासून लग्न रद्द झाल्याच्या कारणावरून भ्रमणध्वनीवरून धमकावत होता. याच विषयावर चर्चा करण्यासाठी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास श्रेयसला विद्यानगरमध्ये बोलावण्यात आले होते. श्रेयस त्याचा मित्र आदर्श कोलेकर आणि इतरांसह तिथे पोहोचला असता आरोपीने शिवीगाळ करत वाद उकरून काढला.

भांडण सोडवण्यासाठी आदर्श कोलेकर हा मध्यस्थी करत असताना संतापलेल्या आरोपीने आपल्याकडील चाकूने आदर्शच्या छातीवर, मानेवर आणि हातावर गंभीर वार केले. यामध्ये आदर्श रक्तबंबाळ झाला असून त्याच्यावर बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी खानापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ऋषांत पुजारीसह आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खानापूर परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: