Dharwad

धारवाडमध्ये काँग्रेस युवा नेत्याची हत्या करणाऱ्या आठ जणांना बेड्या

Share

धारवाडमधील काँग्रेस युवा नेते फॅरोज यांच्या हत्येचा तपास लावण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. मध्यरात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

धारवाड शहर हादरवून टाकणाऱ्या फॅरोज हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आठ जणांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच जणांचा प्रत्यक्ष हत्येत सहभाग असून, उर्वरित तिघांनी हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी फॅरोज यांचा मोबाईल धारवाड-बेळगाव सीमा भागात फेकून दिला होता. तांत्रिक पथकाने मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर आरोपी उप्पिन बेटगेरी येथील नातेवाईकाच्या घरी लपल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य आरोपी मोहम्मद शाह याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येमध्ये एकूण नऊ जणांच्या टोळीचा समावेश होता, त्यापैकी एका फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. सध्या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: