Khanapur

जी. एम. सिद्धेश्वर साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर भागातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला ऊस पुरवून महिना उलटला तरी बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आता आत्महत्येचा इशारा दिला आहे.

हावेरी जिल्ह्यातील तुम्मिनकट्टी येथील जी. एम. शुगर आणि एनर्जी लिमिटेड कारखान्याविरुद्ध खानापूर तालुक्यातील बिडी गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुमारे ५० हून अधिक शेतकऱ्यांनी ४ हजार टनांहून अधिक ऊस कारखान्याला पुरवला असून, त्याचे ४ ते ५ कोटी रुपयांचे बिल अद्याप थकीत आहे. ऊस पुरवठा केल्यानंतर १५ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले होते, मात्र आता देयके देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

कारखान्याकडून २ कोटींहून अधिक उचल घेणाऱ्या ‘शमशेर ग्रुप’ या ऊस तोडणी कंत्राटदाराला शेतकऱ्यांनीच शोधून आणावे, अशी उडवाउडवीची उत्तरे कारखान्याचे कर्मचारी देत आहेत. या प्रकारामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी दावणगेरे जिल्हाधिकारी आणि माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांना भेटून थकीत बिल मिळवून देण्याची विनंती केली आहे.

जर थकीत रक्कम तातडीने जमा झाली नाही, तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा शेतकरी नेते विठ्ठल बेळगावकर यांनी दिला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्वरित द्यावेत, अशी मागणी विठ्ठल बेळगावकर यांनी केली.

Tags: