Dharwad

धारवाडमध्ये घरात घुसून युवा काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या

Share

धारवाडमध्ये युवा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फिरोज पठाण यांची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हाश्मीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

धारवाडमधील माळापूर हाश्मीनगरचे रहिवासी असलेले फिरोज पठाण यांची अज्ञातांनी हत्या केली. फिरोज पठाण यांनी सुरुवातीला एनएसयुआय (NSUI) संघटनेत काम केले होते, त्यानंतर ते युवा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून सक्रिय राजकारणात कार्यरत होते.

शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी फिरोज पठाण यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्यावर चाकू व इतर शस्त्रांनी बेछूट वार केले. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे फिरोज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने धारवाड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या हत्येमागे पूर्ववैमनस्य असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून, स्थानिक व्यक्तींचाच यात हात असावा असा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

फिरोज पठाण यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या घराबाहेर आणि जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पठाण यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशाने परिसर सुन्न झाला होता. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी समर्थकांकडून करण्यात येत आहे.

Tags: