खानापूर तालुक्यातील नंदगडमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात बेळगावच्या विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कल्लाप्पा परशराम सुतार असे आरोपीचे नाव असून एप्रिल २०२५ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती, ज्याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. बी. बिरादार आणि पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांनी अत्यंत तत्परतेने केला. तपासात त्यांना आय. एन. चिन्नवगोळ आणि मंजुनाथ मुसळी यांनी सहकार्य केले, तर न्यायालयीन कामकाजासाठी प्रवीण होंदड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बेळगावमधील विशेष पोक्सो न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी वर्षभराच्या आत पूर्ण झाली. सुनावणी दरम्यान आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी कल्लाप्पा सुतार याला ३० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे युक्तिवाद मांडला. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नराधमाला ही कठोर शिक्षा सुनावली आहे.


Recent Comments