बागलकोट विधानसभा मतदारसंघाच्या हायव्होल्टेज पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण ९ उमेदवार रिंगणत असून त्यांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.

बागलकोट पोटनिवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत ११.८९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्रामुख्याने भाजपचे उमेदवार वीरणा चरंतीमठ आणि काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजप उमेदवार वीरणा चरंतीमठ हे शहरातील मॉडेल प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी हे तिम्मापूर येथील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावणार आहेत. दरम्यान, राज्यसभा खासदार नारायणसा भांडगे यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर येत आपला हक्क बजावला. बागलकोटमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नारायणसा भांडगे यांनी व्यक्त केला आहे.
मतदारसंघात एकूण ३२२ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून २ लाख ५९ हजार ७९७ मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सोय केली असून सुरक्षेसाठी २५०० हून अधिक कर्मचारी आणि पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी ‘पिंक बूथ’ आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयी केल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.


Recent Comments