Dharwad

धारवाड : शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक

Share

धारवाडमधील लक्ष्मीसिंगनकेरे भागात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या आगीत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लक्ष्मीसिंगनकेरे येथील शमीना गदगवाले यांच्या घराला ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे पाहून स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, बराच वेळ होऊनही अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. अखेर अग्निशमन दलाची वाट न पाहता, शेजारील नागरिकांनीच धाडस दाखवत अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ही आग शेजारच्या घरांपर्यंत पसरली नाही, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेची नोंद धारवाडच्या विद्यागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags: