बेंगळुरूमध्ये आज उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून शैक्षणिक संस्थांचा गैरवापर आणि केंद्राकडून राज्याची होणारी आर्थिक कोंडी यावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. बागलकोटमध्ये भाजप उमेदवार वीरण्णा चरंतीमठ यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देऊन त्यांची नावे दोन ठिकाणी मतदार यादीत समाविष्ट करण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेणाऱ्या या अक्रमाविरोधात काँग्रेस कायदेशीर लढा देणार असून, केंद्राने कर्नाटकचा हक्काचा १५ हजार कोटी रुपयांचा निधी रोखल्याने राज्याच्या विकासात अडथळे येत असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारला ‘पिकपॉकेट’ सरकार संबोधत वाढत्या महागाईवर निशाणा साधला. १ एप्रिलपासून औषधे, टोल आणि गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ ही जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा असून गॅस सिलिंडरचे दर २००० रुपयांच्या पार गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केली. भाजपची सत्ता महागाई आणते, तर काँग्रेसच्या गॅरंटी योजना जनतेला आर्थिक सुरक्षा देतात, असे सांगत त्यांनी पोटनिवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.


Recent Comments