Bagalkot

बागलकोट पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा झंझावाती प्रचार

Share

बागलकोट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सुतगुंडार येथे आयोजित भव्य सभेत बोलताना त्यांनी दिवंगत एच. वाय. मेटी यांच्या लोकसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र उमेश मेटी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दिवंगत एच. वाय. मेटी यांनी पाच वेळा आमदार आणि खासदार म्हणून केलेल्या विकासकामांचा दाखला देत, त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेश मेटी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. बागलकोटमध्ये केवळ मेडिकल कॉलेजच नाही, तर सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर उभारण्याची ग्वाही देत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद घातली.

केंद्र सरकारवर निशाणा साधताना मुख्यमंत्र्यांनी युकेपी तिसऱ्या टप्प्यातील योजनेच्या गॅझेट नोटिफिकेशनसाठी होणाऱ्या विलंबावरून भाजपला धारेवर धरले. सिंचन प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत, राज्य सरकारने बागायती आणि कोरडवाहू जमिनीसाठी मोठी नुकसान भरपाई जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारच्या ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘शक्ती’ सारख्या गॅरंटी योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून, विरोधकांना आता या योजनांसमोर हार मानावी लागल्याचे प्रतिपादन सिद्धरामय्या यांनी केले.

Tags: