धारवाडमधील विद्यागिरी पोलिसांनी ‘घरोघरी पोलीस’ या अभिनव उपक्रमांतर्गत कर्तव्यासोबतच माणुसकी जपत ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांतर्गत काही दिवसांपूर्वी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या. यावेळी ८० वर्षीय बिबीजान आजींनी आपल्याला चालण्याफिरण्यासाठी त्रास होत असून, एखादा वॉकर मिळाल्यास सोयीचे होईल, अशी इच्छा व्यक्त केली होती. आजींची अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना वॉकरचे वाटप केले. पोलिसांच्या या मदतीमुळे आजींच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
त्याचप्रमाणे, याच भागातील गंगम्मा आजींना दृष्टीचा त्रास असून त्यांचे संगोपन करणारे कोणीही नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजेच वृद्धाश्रमात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांच्या या संवेदनशील कार्याचे स्थानिक नागरिक आणि परिसरातून कौतुक होत आहे.


Recent Comments