Athani

सभागृहात आयपीएल तिकिटांवरून होणारी चर्चा अनाठायी : लक्ष्मण सवदी

Share

सभागृहात गंभीर विषयांवर चर्चा करण्याऐवजी आयपीएल तिकिटांसारख्या क्षुल्लक बाबींवर वेळ वाया घालवणे अयोग्य असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. अथणीमधील जंबगी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा गंभीर जागतिक संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी सभागृहात आयपीएलच्या तिकिटांसाठी वाद घालणे दुर्दैवी असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे. याचवेळी आमदार राजू कागे आणि आपल्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. आमचे २० वर्षांचे जुने संबंध असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे कागे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

राज्यातील पोटनिवडणुकीवर भाष्य करताना दावणगिरी आणि बागलकोट या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोमवारपासून स्वतः प्रचारात उतरणार असल्याचे सांगतानाच, जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अथणी-खिळेगाव राज्य महामार्गाच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू होईल, अशी माहिती लक्ष्मण सवदी यांनी दिली.

Tags: