बागलकोट शहरात पेट्रोल पुरवठा अचानक विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील बहुतांश पेट्रोल पंप रिकामे झाले असून, ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे तिथे विक्रीवर कडक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

बागलकोटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने इंधनाचे संकट ओढावले आहे. शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत असून, पेट्रोल मिळत नसल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या शहरात केवळ डिझेल उपलब्ध असून पेट्रोलवर चालणारी वाहने रस्त्यावरच उभी राहण्याची वेळ आली आहे. पुरवठा साखळीतील तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या बागलकोटमधील केवळ जिओ पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असून, तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि सर्वांना इंधन मिळावे यासाठी पंप चालकांनी मर्यादा निश्चित केल्या आहेत. एका व्यक्तीला जास्तीत जास्त २०० रुपयांचे पेट्रोल दिले जात असून, डिझेल वाहनांसाठी १,००० रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना तासन् तास रांगेत उभे राहून अल्प प्रमाणात इंधन घेऊन परतावे लागत आहे.


Recent Comments