माजी आमदाराच्या मुलाची कारमध्ये जाळून हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा धारवाड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे.

बैलहोंगलचे माजी आमदार बाबुराव यांचा मुलगा राजू भोळशेट्टी यांचा मृतदेह २३ मार्चच्या मध्यरात्री रामापूर गावातील निर्जन जंगलात त्यांच्याच कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धारवाड ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत मुनीरा शरीफ दुलानायक, तिचा अल्पवयीन मुलगा, बसवराज पुजारी आणि मृत्युंजय कंबार यांना अटक केली आहे. या कटातील आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
या भीषण हत्याकांडामागे अनैतिक संबंध आणि पैशांचे व्यवहार असल्याचे धारवाड जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी स्पष्ट केले. मुख्य आरोपी मुनीरा आणि मृत राजू भोळशेट्टी यांच्यात अनैतिक संबंध होते. मुनीरा, तिचा मुलगा आणि मृत्युंजय या तिघांनी मिळून ही हत्या केली, तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बसवराजची मदत घेतली. मुनीराने प्रथम राजूला फोन करून शेताकडे बोलावले. तिथे वादावादी झाल्यानंतर आरोपींनी चाकू आणि लोखंडी सळईने राजूवर हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकून डिझेलच्या सहाय्याने पेटवून देण्यात आला.
अनैतिक संबंध आणि आर्थिक वादातून हा टोकाचा संताप अनावर झाल्याने ही हत्या करण्यात आली, अशी माहिती गुंजन आर्य यांनी दिली.


Recent Comments