धारवाडमध्ये कौटुंबिक कलहातून हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सरोजा पाटील यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून सविता होंगलमठ असे मृत विवाहितेचे नाव आहे.
धारवाडमधील जयनगर ४ थ्या क्रॉस येथे सविता होंगलमठ यांचा मृतदेह त्यांच्या पतीच्या घरीच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा दावा सविता यांच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. सविता यांचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ सुरू होता आणि पती बसवराज यानेच त्यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वीही सविता यांना झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी त्यांना फाशी देऊन त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. २५ वर्षांपूर्वी बसवराज याच्याशी सविता यांचा विवाह झाला होता आणि तेव्हापासूनच त्यांना त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
माझ्या मुलीला सासरच्या जाचाला सामोरे जावे लागत होते आणि त्यांच्या पतीनेच तिची हत्या केली आहे, अशी आरोप मृत महिलेची आई सरोजा पाटील यांनी केला आहे. .
याप्रकरणी बसवराज होंगलमठ यांच्यासह कुटुंबातील तीन सदस्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली असून पोलीस तपासातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


Recent Comments