Bagalkot

पोटनिवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस हायकामंडचा मास्टर प्लॅन

Share

राज्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात आला असून बागलकोट आणि दावणगेरे या दोन्ही जागा खिशात घालण्यासाठी काँग्रेसने बेळगावच्या तीन दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि लक्ष्मण सवदी यांच्या खांद्यावर हायकमांडने विजयाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

बागलकोट आणि दावणगेरे पोटनिवडणुकीत विजयाची मोहोर उमवण्यासाठी काँग्रेसने आपली रणनीती अधिक आक्रमक केली असून बेळगाव जिल्ह्यातील संघटन चतुर नेत्यांना विशेष टास्क दिले आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे बागलकोट जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली असून, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर दावणगेरे मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अहिंदा मतांच्या एकत्रीकरणासाठी सतीश जारकीहोळी तर महिला मतदारांवरील प्रभावासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या क्षमतेचा वापर करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले हे दोन्ही नेते आधीच आपापल्या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.

दुसरीकडे, लिंगायत मतांची मोट बांधण्यासाठी आणि स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकातील प्रभावशाली नेते असलेले लक्ष्मण सवदी दोन्ही मतदारसंघांत फिरून पक्षासाठी मतांची जुळवाजुळव करणार आहेत. जातीपातीचे समीकरण आणि बूथ पातळीवरील नियोजनाद्वारे विरोधकांना शह देण्यासाठी बेळगावचे हे तीन दिग्गज नेते सज्ज झाले असून, ही पोटनिवडणूक आता खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची ठरली आहे.

Tags: