Dharwad

धारवाडच्या चिक्कमल्लिगावाडमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोघे गंभीर जखमी

Share

धारवाड तालुक्यातील चिक्कमल्लिगावाड गावाजवळ क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धारवाडचे अश्पाक पठाण आणि सैबाज जमादार हे आपल्या मित्रांसह चिक्कमल्लिगावाड येथील एका रिसॉर्टमध्ये पोहण्यासाठी गेले होते. तिथे दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला, मात्र स्थानिकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला होता. त्यानंतर अश्पाक आणि सैबाज आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना, पुन्हा एकदा वाद उफाळून आला.

एका व्यक्तीने त्यांची दुचाकी अडवून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीने अश्पाकच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यानंतर अन्य ३-४ जणांनी येऊन सैबाजसह त्याच्या मित्रांनाही लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

हा संपूर्ण थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी उल्लवप्पा धारवाड, राजू कोरी, शिवप्पा कल्लूर, निंगप्पा नडुविनमनी आणि मुदुकप्पा कडेमनी या चिक्कमल्लिगावाड येथील संशयितांची ओळख पटली आहे. या पाचही जणांविरुद्ध धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: