पाणी आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे मत हुक्केरी येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश राजण्णा संकण्णवर यांनी व्यक्त केले.

हुक्केरीमध्ये तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, तालुका पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश राजण्णा संकण्णवर यांनी केले.

वकील संघाचे अध्यक्ष के. बी. कुरबेट यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, अधिकाऱ्यांनी कायदेशीर चौकटीत राहून पाण्याचे महत्त्व आणि संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लादड, बालविकास प्रकल्प अधिकारी होळेप्पा एच., सरकारी वकील अनिल करोशी, एस. जे. नदाफ, शिवलिंग तेली आणि ज्योती बडनाळ उपस्थित होते.
ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद अण्णिगेरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. पाणी हे जीवन असून पाण्याशिवाय सजीव सृष्टी जगू शकत नाही. त्यामुळे पाण्याचे जतन करण्याच्या उद्देशाने आज जागतिक जल दिन साजरा केला जात असल्याचे अण्णिगेरी यांनी नमूद केले.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना न्यायाधीश राजण्णा संकण्णवर यांनी स्पष्ट केले की, निसर्ग आणि पाणी वाचवण्यासाठी सर्वसामान्यांची भूमिका महत्त्वाची आहे. साक्षरतेच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाणी बचतीचे मार्ग लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एस. एस. मठद, चेतन कडकोळ, संतोष पाटील, अभिषेक पवार, नागय्या हिरेमठ तसेच वकील आशा सिंगाडी, अनिता कुलकर्णी आणि विविध ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments