Hukkeri

बेळगाव जिल्ह्यात पीक संरक्षण अभियान; तीन हजार शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Share

बेळगाव जिल्ह्यात खरीप पिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पीक संरक्षण अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी दिली.

कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी शास्त्रज्ञ आणि हुक्केरी तालुका सहाय्यक कृषी संचालकांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. अभियानांतर्गत पथकांनी हुक्केरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तसेच कृषी सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन औषध वितरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना जिल्हा कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर म्हणाले, “पिकांवरील रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात तज्ज्ञांची ८ पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एकाच दिवसात सुमारे तीन हजार शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांवरील रोगांच्या निवारणासाठी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.”

यावेळी हुक्केरी सहाय्यक कृषी संचालक महादेव पटगुंदी यांनी रासायनिक औषध फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी माजी जि. प. सदस्य महेश बाते, चिकोडी उप कृषी संचालक सहदेव यरगोप्प, बेळगावचे सहाय्यक कृषी संचालक सलिम संग्रास, रवींद्र नायकर, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सुनीलकुमार नूली, तुक्कानाट्टी कृषी विज्ञान केंद्राचे डी. सी. चौगुला यांच्यासह कृषी क्षेत्रातील अधिकारी व विक्रेते उपस्थित होते.

– राजू बागलकोट, इन न्यूज, हुक्केरी.

Tags: