Khanapur

इंधन टंचाईच्या अफवेमुळे खानापूरमधील पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड

Share

जागतिक स्तरावर इंधन संकट ओढवण्याच्या चर्चेने खानापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार नाही किंवा त्याच्या किमती गगनाला भिडतील, या अफवेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन साठवणूक करण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहेत.

खानापूर शहरासह नंदगड, बिडी आणि बेकवाड यांसारख्या प्रमुख ठिकाणांवरील पेट्रोल पंपांवर सध्या यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंधन संपण्याच्या भीतीपोटी शेकडो वाहनधारक रांगा लावत असून, यामुळे सर्वसामान्यांची मोठी धावपळ होत आहे. ही केवळ अफवा आहे की खरोखरच पुरवठा विस्कळीत होणार आहे, याबाबत संभ्रम असल्याने नागरिकांनी साठवणुकीवर भर दिला आहे.

तालुका प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन इंधनाच्या उपलब्धतेबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी आणि पंपांवरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी सार्वजनिक क्षेत्रातून केली जात आहे.

Tags: