Khanapur

खानापूरमधील हलसीवाडीत तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू

Share

पाणी संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या बेळगावमधील नामांकित ‘प्यास फाउंडेशन’ने खानापूर तालुक्यातील हलसीवाडी येथील तलावांच्या कायाकल्पासाठी पुढाकार घेतला असून एकेपी फेरोकास्ट संस्थेच्या सीएसआर निधीच्या सहयोगातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हलसीवाडीमधील दोन प्रमुख तलावांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे भविष्यात गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी केले.

एकेपी फेरोकास्टचे पराग भंडारे आणि प्रीती भंडारे यांच्या आर्थिक सहकार्यातून हे कार्य शक्य झाले असून, याअंतर्गत तलावातील गाळ काढणे, पाळूची दुरुस्ती करणे आणि पाणी साठवण क्षमता वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थ वामन देसाई यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या जलकार्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासोबतच शेती व्यवसायाला नवी उभारी मिळेल, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Tags: