Bailahongala

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प गावामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संशयातून एका निष्पाप महिलेचा बळी गेला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश केला. बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथील रहिवासी बसवराज गिरेप्पा जोडाळ्ळी याने आपली पत्नी शिवक्का हिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दांपत्याचा प्रेमविवाह झाला असून त्यांना तीन मुले आहेत. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. पतीच्या अमानुष जाचाला कंटाळून शिवक्का आपल्या दोन मुलांसह माहेरी राहण्यास गेली होती. तिथेही आरोपीने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, ज्याची तक्रार दोडवाड पोलीस ठाण्यात आधीच नोंदवण्यात आली होती.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने शिवक्काच्या माहेरी जाऊन तिला अश्लील शिवीगाळ करत घराबाहेर रस्त्यावर ओढत नेले. भररस्त्यात त्याने शिवक्कावर जीवघेणा हल्ला चढवला आणि तिथलाच एक मोठा दगड तिच्या डोक्यावर व पायावर फेकून तिची जागीच हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, दोडवाड पोलिसांनी तत्परतेने चक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच पसार झालेल्या आरोपी बसवराजला अटक केली. पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून तपास पथकाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Tags: