बेळगाव शहरात सायबर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरवले असून तब्बल २ हजार ९९२ ‘म्युअल अकाउंट्स’द्वारे व्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना या रॅकेटचा पर्दाफाश केला.
शहरात सध्या २ हजार ९९२ म्युअल अकाउंट्स सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून यापैकी ७७२ खात्यांमधून फसवणुकीचे व्यवहार झाले आहेत. या सर्व खात्यांची केवायसी माहिती जमा करून संबंधित खातेदारांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांवर आगामी काळात कडक पावले उचलली जातील, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली.
सायबर गुन्हेगार प्रामुख्याने मित्र, ओळखीचे लोक किंवा घरकाम देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांची बँक खाती गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरत आहेत. लोकांच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीचे पैसे वळवले जात असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. आपले बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नये, अन्यथा खातेदारालाही या गुन्ह्यात सहआरोपी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा भूषण बोरसे यांनी दिला.
मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. अगदी जवळच्या मित्रांकडून आलेल्या शुभेच्छा संदेशांमधील लिंकबाबतही नागरिकांनी जागरूक राहावे. सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी हाच एकमेव उपाय असल्याचे भूषण बोरसे यांनी म्हटले आहे.


Recent Comments