Hukkeri

हुक्केरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामदैवत लक्ष्मी देवीची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना

Share

हुक्केरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा १० ते १४ मार्च दरम्यान अत्यंत उत्साहात पार पडली. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देवीचा रथोत्सव आणि होन्नाटाचा आनंद लुटत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.

यात्रेनिमित्त विविध राजकीय नेते, मान्यवर आणि मठाधीशांनी देवीचे दर्शन घेतले, तर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरात बॅनर्स लावून आपला उत्साह व्यक्त केला. यात्रेदरम्यान भाविकांनी जात-पात विसरून विविध मनोरंजनाच्या खेळांमध्ये सहभाग नोंदवला. १४ मार्च रोजी लक्ष्मी देवी मंदिरासमोर रांगोळी काढून विधीवत पूजा करण्यात आली, त्यानंतर रात्री सीमोल्लंघनाने यात्रेची सांगता झाली.त्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवीच्या मूर्तीला नवीन वस्त्रे आणि अलंकार चढवून, विधिवत ओटी भरून नैवेद्य दाखवण्यात आला. या धार्मिक विधीनंतर देवीची मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली.

यात्रेच्या यशस्वीतेबद्दल यात्रा कमिटीचे सदस्य गुरु कुलकर्णी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे लक्ष्मी देवीची यात्रा शांततेत पार पडली असून पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि तालुका प्रशासनाने दिलेल्या योगदानाबद्दल गुरु कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

गोकाकचे डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बससापुरे आणि त्यांच्या पथकाने यात्रेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे केल्याबद्दल हुक्केरी पोलिसांचे सार्वजनिक स्तरावर कौतुक होत आहे.

Tags: