Dharwad

धारवाडच्या कलघटगीमध्ये गारांचा जोरदार वर्षाव

Share

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी आणि परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थंडावा मिळाला असला तरी, गारांच्या वर्षावामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यात दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या मुख्य रस्त्यांवर गारांचे अक्षरशः खच साचले होते, हे दृश्य पाहून स्थानिक नागरिक थक्क झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारांच्या वर्षावामुळे कलघटगी शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर दिसून आला.

या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या आंब्याला फळे लागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गारांचा फटका बसल्याने यंदा हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे तरुणाई या गारांच्या पावसाचे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यात मग्न होती, तर दुसरीकडे बळीराजा या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे.

Tags: