Dharwad

धारवाड :पाणीपुरवठ्याबाबत शिवलीला कुलकर्णींच्या अधिकाऱ्यांना सूचना

Share

धारवाड जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक तसेच पशुधनाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश कर्नाटक राज्य शहर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाच्या अध्यक्षा शिवलीला कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

धारवाड येथील तालुका पंचायत सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या. येणाऱ्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, तहसीलदार आणि पंचायत स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करावे. कोणत्याही गावात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नागरिकांकडून येणाऱ्या पाणी टंचाईच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यावर विनाविलंब कार्यवाही करून तोडगा काढावा, असे कडक निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस तहसीलदार, धारवाड तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी , जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पीडीओ, प्रशासकीय अधिकारी आणि ग्राम लेखापाल उपस्थित होते.

Tags: