कर्नाटक विद्यापीठातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत धारवाडमध्ये दलित संघटना आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र निदर्शने केली. विद्यापीठ प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत आंदोलकांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

दलित संघटनांच्या महामंडळाच्या नेतृत्वाखाली कर्नाटक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कुलसचिवांच्या कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठाच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील १३ शिक्षक तसेच वसतिगृह अधीक्षकांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन न करताच सिंडिकेट सभेची मंजुरी मिळवून घाईघाईने ही भरती उरकली जात असल्याची तक्रार दलित संघटनांच्या नेत्यांनी केली.
उच्च शिक्षण विभागाच्या नियमानुसार मुलाखतीचे गुण त्याच दिवशी जाहीर करणे बंधनकारक असताना, कुलगुरू आणि कुलसचिवांनी हे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक नसल्याने ती तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागणी मान्य न झाल्यास अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दुसरीकडे, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भरती प्रक्रिया अद्याप सुरू असून अद्याप कोणालाही नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत, असे कुलगुरू यांनी स्पष्ट केले.


Recent Comments