Hukkeri

हुक्केरीमधील ५० सरकारी शाळांचे रूप पालटणार; शिवानंद महाशेट्टी

Share

हुक्केरी तालुक्यातील सरकारी शाळांचे डिजिटलीकरण करणे हा आमच्या संस्थांचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन ऑनलाईन इन्स्ट्रुमेंट्स इंडिया लिमिटेडचे सह-संस्थापक शिवानंद महाशेट्टी यांनी केले आहे.

ऑनलाईन इन्स्ट्रुमेंट्स इंडिया लिमिटेड आणि बी. जी. बेल्लद शिक्षण व समाजसेवा संस्था कब्बूर यांच्या वतीने हुक्केरी तालुक्यातील ५० सरकारी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हुक्केरी येथील विश्वराज भवनमध्ये पार पडलेल्या या समारंभाचे उद्घाटन निडसोसी येथील जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात करण्यात आले. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश कत्ती यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रकाश बेल्लद, महावीर निलजगी, राजेश्वरी महाशेट्टी, सुरेश बेल्लद, संदीप हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश बेल्लद आणि शिवानंद महाशेट्टी यांनी सुमारे एक कोटी रुपयांची उपकरणे सरकारी शाळांना देऊन आपले मोठेपण सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार रमेश कत्ती यांनी केले.

या कार्यक्रमात अलीकडेच युपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या किरण कमते आणि बसवराज पाटील यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

आम्ही ही प्रगत उपकरणे केवळ सरकारी शाळांनाच मोफत देत आहोत. आमचे प्राथमिक शिक्षण या भागातील शाळांत झाल्याने हुक्केरी व चिकोडीला प्राधान्य दिले असून, भविष्यात संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविणार असल्याचे शिवानंद महाशेट्टी यांनी सांगितले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते ५० शाळांमधील मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडे एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटरअॅक्टिव्ह बोर्ड’ सुपूर्द करण्यात आले.

गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही हुक्केरी, चिकोडी, रायबाग आणि मूडलगी तालुक्यातील सरकारी शाळांना इंटरअॅक्टिव्ह बोर्डसह शालेय साहित्य पुरवत आहोत. विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन सुजाण नागरिक बनावे, असे आवाहन महेश बेल्लद यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला राजेश्वरी महाशेट्टी, अनिता बेल्लद, संदीप महाशेट्टी, श्रेयस संपगांवी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी ए. एस. पद्मण्णावर, एम. डी. बडिगेर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: